Home सांस्कृतिक NCERT चा निर्णय वादग्रस्त! 8 वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला

NCERT चा निर्णय वादग्रस्त! 8 वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला

0
18

सातारा —  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत वृषालीराजे भोसले यांनी तो खेदजनक व निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी नमूद केले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मराठा साम्राज्याने दिल्लीच्या राजकारणावर आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मराठ्यांचा पराक्रम सह्याद्रीपुरता मर्यादित न राहता अटकेपार पोहोचला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे.

राजस्थानमधील रामपुरा मोहीम, बुंदीतील हस्तक्षेप, कक्कोरचे युद्ध तसेच पाटण आणि मेर्टा येथील विजय हे मराठ्यांच्या युद्धनीतीचे जिवंत पुरावे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात अनेक राजपूत संस्थानांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते.
अशा परिस्थितीत मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे इतिहास पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये. तो पुराव्यांच्या आधारे पुढील पिढीपर्यंत जसाच्या तसा पोहोचवणे गरजेचे आहे. मराठ्यांच्या उत्तरेकडील प्रभावाचा पुरावा देणारा नकाशा हटवणे हे ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रकरणी सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असा इशाराही वृषालीराजे भोसले यांनी दिला.
“हा केवळ इतिहास नाही, तर आमचा स्वाभिमान आहे आणि त्याचे रक्षण आम्ही नक्की करू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here