वाघिरा फाट्यावर भीषण अपघात; सैन्यदलात भरती झालेला जवान जागीच ठार

Spread the love

लिंबागणेश — अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाघिरा फाट्यानजीक बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील संदिपान भगवान बांगर वय २० वर्ष  हे मोटारसायकल क्र. एमएच २३ एएच ८४८१ वरून वाघिरा फाट्यावरून गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या सातारा येथील चारचाकी वाहनाने क्र. एमएच ११ बीके ००७९ जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संदिपान बांगर यांचा जागीच मृत्यू झाला.

संदिपान बांगर हे नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार गणेश परझने, तलाठी गणपत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *