Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

परळी (बीड) — परळी तालुक्यातील मोहा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तरुणीने युवकाच्या तोंडात मारल्याच्या अपमानानंतर युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने आपल्या वडिलांना केलेल्या फोनमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
मृत तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी गावातील करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात एका तरुणीने सर्वांसमक्ष चंद्रहार शिंदे च्या तोंडात मारल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्यामुळे चंद्रहार मानसिक तणावाखाली गेला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
यानंतर १४ मे रोजी सायंकाळी चंद्रहार शिंदे याने आपल्या वडिलांना फोन करून, “हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. मुलाच्या या बोलण्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
कुटुंबीयांनी चंद्रहारचा शोध घेतला असता, चंद्रहार शिंदे हा मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि त्याआधी घडलेल्या घटनांचा तपशील तपासातून समोर येणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक अपमान, सामाजिक दबाव आणि मानसिक आरोग्य या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मानसिक तणावाची लक्षणे वेळेवर ओळखणे आणि संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.