Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच बीड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला लक्ष्य करत आरोपीने तिच्यावर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसारखे गंभीर प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपी अमर बांगर याने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीने पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत पाशवी अत्याचार केले.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बदनामीची धमकी देत मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली. कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मोठी रक्कम दिली, मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील अत्याचाराच्या घटना 23 एप्रिल 2025 रोजी बीड येथे तसेच 15 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार येथे घडल्याचे समोर आले आहे. अखेर पीडित महिलेनं धाडस दाखवत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून आरोपी अमर बांगरचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपी अमर बांगर हा काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्याची चर्चा असून त्याचे नाव वाल्मिक कराड गँगशी जोडले जात असल्याचेही बोलले जात आहे. तसेच आरोपीचे वडील किरण बांगर हे पंचायत समितीचे माजी सभापती राहिले असून त्यांचे राजकीय क्षेत्राशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.