Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी रविवारी (दि. २४) पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह पोलीस प्रशासनाला गती देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या बदली प्रक्रियेत प्रशासकीय कारणांसोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचाही विचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.

या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर पोलीस ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पाटोदा येथील पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची बीड शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले वैभव पाटील यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली असून शिवाजीनगरचे प्रभारी प्रवीणकुमार बांगर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच उमाकांत कस्तुरे यांची प्रभारी पाटोदा पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली असून स्वप्नील उनवणे यांची केजवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जातही मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. संदीप मांजरमे यांची प्रभारी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात, राजेंद्र घुगे यांची धारूर येथे, तर संतोष जाधवर यांची केज पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सतिष कोटकर, अतुलकुमार लांडगे, गोरकनाथ दहिफळे, रंगनाथ जगताप, मच्छिंद्रनाथ शेंडगे, देविदास वाघमोडे, मधुसूदन घुगे, विजय नरवाडे, प्रल्हाद मुंडे, बाबा राठोड, मंगेश साळवे, नित्यानंद उबाळे, देविदास सोनवळे, विक्रांत हिंगे, दिपक लंके आणि राजेश गडवे यांच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक स्तरावरही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रमेश घुले यांची अंबाजोगाई शहर येथे, शेखर औटे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, अनिल शिंदे यांची अंबाजोगाई शहर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच केरबा माकणे, स्वप्निल कोळी, संजय कुकलारे, अप्पासाहेब रोकडे, श्रीकृष्ण शिंदे, अर्जुन गोलबाल, नितीन काकरवाल, राजू राठोड, देविदास खांडखुळे आणि आनंद जाधव यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सायबर पोलीस ठाणे बीड येथे कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाणे यांना त्याच ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलातील या व्यापक बदल्यांमुळे अनेक पोलीस ठाण्यांच्या कारभारात नव्या अधिकाऱ्यांची एंट्री झाली असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.