Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — शहरातील एमआयडीसी परिसरात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सरकी आणि पेंडचा मोठा साठा जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की, अग्निशमन दलाला तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या सुभाष सारडा यांच्या मालकीच्या गोदामात सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर सरकी, पेंड आणि अन्य ज्वलनशील साहित्याचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केले.
आगीतून निघणारे धुराचे प्रचंड लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब, पाण्याचे टँकर आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग नियंत्रणात आणणे अग्निशमन दलासाठी मोठे आव्हान ठरले. सतत पाण्याचा मारा करूनही ज्वाला पुन्हा-पुन्हा भडकत असल्याने गोदामातील साहित्य जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
सुमारे सहा तास सुरू असलेल्या बचाव आणि अग्निशमन मोहिमेनंतर अखेर दुपारी बारा वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या भीषण आगीत गोदामातील सरकी, पेंड, ताडपत्री तसेच शेडवरील पत्रे पूर्णपणे जळून खाक झाली. आगीच्या तीव्रतेमुळे गोदामाच्या काही भिंतीही कोसळल्या. महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणेकडून पंचनामा सुरू असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.