Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील 57,873 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तब्बल 589.93 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
बीड — राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील तब्बल 57 हजार 873 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 589 कोटी 93 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 68 हजार 751 शेतकऱ्यांना 1 हजार 508 कोटी 49 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, 4नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या चौथ्या यादीत पात्र शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात आला. यामध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्ज घेतलेल्या 1 हजार 487 शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 कोटी 95 लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभ राष्ट्रीयीकृत बँका आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना मिळाला आहे.

या योजनेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 878 शेतकऱ्यांच्या 918 कोटी 56 लाख रुपयांच्या कर्जमुक्तीला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर चौथ्या यादीतील 589.93 कोटींच्या लाभाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमुक्तीचा एकूण आकडा 1 हजार 508 कोटी 49 लाख रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या तीन याद्यांमध्ये 2 लाख 4 हजार 366 थकीत पीककर्जदार शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली होती. त्यापैकी 1 लाख 75 हजार 429 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप 28 हजार 937 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे.
विशेष म्हणजे, प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी 11 हजार 80 जणांकडे फार्मर आयडी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्र असूनही तांत्रिक प्रक्रियेमुळे लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या यादीत नाव असलेल्या मात्र प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
आणखी वाचा: सह्याद्री माझा मुख्य बातम्या