बीड FDA कारवाई आज सकाळी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडी हॉटेलवर धडक कारवाई केली आहे.
बीड — दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात धडक कारवाई करत एमआयडीसीतील मे. पाबळे नमकीन आणि मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी हॉटेलचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. तर नेकनूरच्या बाळासाहेब खवा विक्री केंद्रातील ७० किलो खवा जप्त करून नष्ट, ताडसोन्ना-बोरदेवी येथील मे. माऊली खवा केंद्राचा विनापरवाना व्यवसाय बंद करण्याचे आदेश, तर बीडच्या मे. गोरे बंधू मसाले येथील २९८ किलो रेड चिली पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक परवान्यांचा अभाव आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
पाबळे नमकीनचा परवाना निलंबित; १,४२२ किलो माल जप्त
बीड FDA कारवाई: शहरातील एमआयडीसी परिसरातील मे. पाबळे नमकीन या नमकीन व फरसाण उत्पादक आस्थापनाची २३ ऑक्टोबर रोजी अचानक तपासणी करण्यात आली. उत्पादन कक्षातील अस्वच्छता, अपुरे वायुवीजन, खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, तसेच कामगारांचे वैद्यकीय दाखले आणि लसीकरणाबाबत त्रुटी आढळल्या.

तपासणीदरम्यान शेव, रेडी चिली पावडर, नमकीन, पापडी आणि रॉ मेझ फ्लेक्स या खाद्यपदार्थांचे पाच नमुने घेण्यात आले. यापूर्वी १,४२२ किलो साठा आणि १ लाख ३२ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने या उत्पादक आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित केला.
मामा काठियावाडी हॉटेलवरही परवाना निलंबनाची कारवाई
मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी हॉटेल प्रशासनाच्या कारवाईत सापडले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये केलेल्या तपासणीनंतर हॉटेल व्यवस्थापनाला सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, एका महिन्यात त्रुटींची पूर्तता न झाल्याने फेरतपासणी करण्यात आली.
या तपासणीत पिण्याच्या पाण्याचा प्रयोगशाळा अहवाल नसणे, स्वयंपाकघरात उघड्या कचराकुंड्या, चिमणीवर साचलेली काजळी, मुदत संपलेले अन्नपदार्थ वापरणे आणि कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे व हेअर कॅप नसणे अशा त्रुटी आढळल्या. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या हॉटेलचा अन्न परवाना २३ ऑक्टोबर २०२६ पासून निलंबित करण्यात आला.
बाळासाहेब खवा केंद्रातील ७० किलो खवा नष्ट
नेकनूर येथील बाळासाहेब खवा विक्री केंद्राची २२ ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली. या ठिकाणी कमालीची अस्वच्छता आढळल्याने सुमारे ७० किलो खवा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत १९ हजार ६०० रुपये असून, जप्त केलेला खवा जागीच नष्ट करण्यात आला.
दिवाळीत मिठाईसाठी खवा आणि माव्याची मागणी वाढते. अशा वेळी खव्याची साठवणूक आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खवा विक्री केंद्रांवरील तपासणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बीड FDA कारवाई : माऊली खवा केंद्राचा विनापरवाना व्यवसाय बंद करण्याचे आदेश
ताडसोन्ना-बोरदेवी परिसरातील मे. माऊली खवा केंद्र कोणत्याही वैधानिक परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले. अनारोग्यकारक वातावरणात खवा साठवण्यात येत असल्याने प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. या ठिकाणाहून २४ किलो आणि ७ किलो असा खवा साठा जप्त करण्यात आला. त्यातील काही भाग जागीच नष्ट करण्यात आला.
गोरे बंधू मसालेचा २९८ किलो साठा जप्त
बीड शहरातील मे. गोरे बंधू मसाले येथे २४ ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने रेड चिली पावडरचा नमुना घेण्यात आला. त्यानंतर उर्वरित २९८ किलो साठा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत ८९ हजार ४०० रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
नमुन्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई
बीड FDA कारवाई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आणि बीडचे सहायक आयुक्त एन. डी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांविरुद्ध कायद्यानुसार पुढील, तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षेचे नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा विक्रीबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, अधिक माहिती FDA महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.
बीड जिल्ह्यातील आणखी ताज्या घडामोडींसाठी आमचा बीड बातम्या विभाग वाचा.