परळी — तालुक्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात धर्मपुरी मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजारमूल्य 9 लाख 77 हजार 320 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय 55) आणि वसीम बाबुलाल अत्तार, दोघेही रा. धर्मापुरी, ता. परळी, यांच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आली. धर्मापुरी परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये घरात ठेवलेल्या एका पांढऱ्या पोत्यात उग्र वास येणारा हिरवट रंगाचा पदार्थ आढळून आला. तपासणी व वजन केल्यानंतर तो 20 किलो 340 ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ गांजा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपी आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 20 आणि 29 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद करीत असून अंमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

