महाविद्यालयीन लिपिकाचे अपहरण; दोन तास बेदम मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

परळी — बँकेच्या कर्जाच्या जामीनीवरून तसेच पैशांच्या जुन्या व्यवहारातील वादातून एका महाविद्यालयीन लिपिकाचे अपहरण करून त्यांना लाकडी काठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

्मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले अनिल बाबुराव पत्की यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, त्यांची आरोपी वैजनाथ यादव याच्याशी अनेक वर्षांपासून ओळख होती. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. पत्की यांनी घेतलेले एक लाख रुपये परत केल्यानंतरही यादव आणखी चार लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच यादवने घेतलेल्या बँक कर्जाच्या जामीनकीतून आपले नाव काढून घेण्यासाठी पत्की सातत्याने पाठपुरावा करत होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

पैशांचा हिशोब करण्याच्या बहाण्याने नेले

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वैजनाथ यादव याने पैशांचा हिशोब पूर्ण करण्याचे कारण सांगून अनिल पत्की यांना दुचाकीवर बसवून काळरात्री देवी मंदिर परिसरात नेले. तेथे आधीच उपस्थित असलेल्या दोन अनोळखी साथीदारांसह त्याने पत्की यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

लाकडी काठी आणि बेल्टने मारहाण

आरोपींनी पत्की यांना लाकडी काठी आणि बेल्टच्या साहाय्याने पाठीवर, डोक्यावर आणि पायावर मारहाण केली. तसेच आरडाओरडा केल्यास किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सुमारे दोन तास हा मारहाणीचा प्रकार सुरू होता.

मोबाईलमधील सिमकार्ड काढून मोबाईल गायब

मारहाणीनंतर आरोपींनी पत्की यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतले आणि मोबाईलही गायब केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पत्की यांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची गंभीर दखल घेत परळी शहर पोलिसांनी वैजनाथ यादव आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, मारहाण व धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गडूवार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles