आष्टीत दिवसाढवळ्या घरफोडी; नामांकित वकिलाच्या घरातून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

आष्टी — बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आष्टी-डोईठाण रस्त्यालगत बेलगाव शिवारातील एका नामांकित वकिलाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील ज्येष्ठ वकील व शेतकरी आदिनाथ गुलबराव पोकळे (वय ६५) हे आपल्या कुटुंबासह आष्टी-डोईठाण मार्गावरील शेतातील घरात वास्तव्यास आहेत. ६ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांची पत्नी मीनाक्षी पोकळे शेतात लिंबे तोडण्यासाठी गेले होते.

सुमारे एका तासानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाटाचे लॉकही तोडलेले आढळले. चोरट्यांनी कपाटातील सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली होती.

तपासात कपाटातून १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, १८ ग्रॅम वजनाचे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गाठण आणि ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची फॅन्सी नथ असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले.

या प्रकरणी आदिनाथ पोकळे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारांची माहिती तपासली जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles