बीड — समाजाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे.बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने देखील रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेले साहेबराव पवार वय 40 वर्ष यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. पहिला संसार तुटला म्हणून साहेबराव पवार यांनी दुसरा संसार थाटला. मात्र अनितासोबत संसार सुरू असतानाच साहेबराव यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार (21) याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले आणि संसार थाटला.

दुसरी पत्नी आणि आपला मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने साहेबराव पवार यांनी अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅप केला. साहेबराव पवार आणि पोलिसांनी तेलंगणा गाठून अनिता आणि अनिल या दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र घरी आल्यावर आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत, या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. या घटनेमुळे अनिल याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतरही अनिलची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. याचदरम्यान, सावत्र आई अनितालाही तीव्र धक्का बसला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने अनिताने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यंकटराव डावळे सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका शासकीय शिरीषच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष डॉक्टर धपाटे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर धपाटे त्यांनी तत्परता दाखवत तत्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कांदे व मंगेश भोले हे तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. यानंतर अनिताची डेड बॉडी तपासणीसाठी स्वराती रुग्णालयात पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

