परळी — शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोंढा परिसरातील त्यांच्या मालकीच्या ‘रिद्धी सिद्धी’ हॉटेलमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी शिंदे यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास परळी संभाजीनगर पोलीस करत आहेत.
माझी त्याच्याशी ओळखही नव्हती” – शिवाजी शिंदे
हल्ल्यानंतर शिवाजी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सुरवसे नावाच्या तरुणाची माझी कोणतीही ओळख नव्हती. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलामध्ये काही वाद झाल्याचे समजले. तो काल रात्री माझ्या गावी घरासमोर आला होता. त्यावेळी त्याने माझ्या आणि मुलाच्या विरोधात अश्लील शिवीगाळ केली. मी त्याला समजावून परत पाठवले होते.”

हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने हल्ला
शिंदे पुढे म्हणाले की, “दुसऱ्या दिवशी दुपारी मी माझ्या पत्नीसमवेत मोंढा परिसरातील ‘रिद्धी सिद्धी’ हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यावेळी तो युवक आणि त्याचे तीन ते चार सहकारी हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी अचानक कोयत्याने हल्ला केला.”
या हल्ल्यात शिंदे यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून हात-पायावरही अनेक वार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
हत्या की लूट?
हल्लेखोरांनी हॉटेलमधील काही रक्कमही लुटल्याचा आरोप शिवाजी शिंदे यांनी केला आहे. “त्यांचा उद्देश माझी हत्या करणे होता की लूट करणे हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या घटनेनंतर परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.




