दारू दुकानातील वादातून कर्मचाऱ्याची हत्या; आरोपी ‘लाला’ स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

बीड —  शहरातील बालेपीर परिसरात दारू दुकानातील हिशोबाच्या वादातून एका कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता उमेश दळवी (वय 28, रा. गोरेवस्ती, बालेपीर, बीड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती उमेश नवनाथ दळवी (वय 35) हे एका दारू दुकानात काम करत होते. दुकानातील काम व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला याने यापूर्वीही उमेश दळवी यांना मारहाण केली होती.
दरम्यान, 23 मे 2026 रोजी दुकानातील हिशोबात घोळ झाल्याच्या कारणावरून आरोपीने उमेश दळवी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 124/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 115(1), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 3(1)(4), 3(1)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. 26 मे रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी बालेपीर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला शेख समद (वय 38, रा. इंदिरा गांधी शाळेजवळ, आमराई, नगर रोड, बालेपीर, बीड) याला ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून पुढील तपासासाठी त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles