बीड — शहरातील पेठ बीड परिसरातून गोवंश जातीच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. तब्बल 190 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही आणि टोल नाक्यांची तपासणी करत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

दिनांक 6 मे 2026 रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात गोवंश चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान बीड शहरातील 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित स्कॉर्पिओ वाहन आढळून आले मात्र नंबर प्लेट वारंवार बदलल्यामुळे आरोपींचा माग काढणे आव्हानात्मक ठरत होते.
तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि टोल नाक्यांच्या मदतीने पोलिसांनी संशयित वाहनाचा माग घेत मालेगावमार्गे सिल्लोडपर्यंत धडक मोहीम राबवली. पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी बीडमधून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात इम्रान शेख , वय 34 वर्ष, रा. अब्दालशहा नगर, सिल्लोड हे.मू. दरेगाव तालुका मालेगाव जि. नाशिक,शेख तय्यब शेख शफीक वय 40 वर्ष,रा.. मोघपुरा सिल्लोडआणि सलमान सय्यद रा . बापू नगर सिल्लोड यांची नावे समोर आली असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. तपासात या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




