बीड — सौर कृषी पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या अधिकाऱ्याला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
कृष्णा आश्रुबा पाळवदे (वय ३३) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते तेलगाव येथील महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तक्रारदार शेतकऱ्याने सौर कृषी पंपासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, हे प्रमाणपत्र देण्यासाठी पाळवदे यांनी एक हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने चिंचोली परिसरात सोमवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना कृष्णा पाळवदे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात समाधान कवडे, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी आणि गणेश मेहत्रे यांचा समावेश होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आष्टी येथेही महावितरणच्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर आता बीड विभागातील ही दुसरी मोठी कारवाई ठरल्याने सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

