माजलगाव (बीड) — जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या पित्याने स्वतःच्या दोन लहान मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे घडली असून, वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.

काय घडले नेमके?
फिर्यादी अश्विनी महेश सोमासे (वय 33, रा. टालेवाडी) या पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे सध्या माहेरी राहत होत्या.
दि. २ मे रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता, त्यांचे पती महेश विष्णू सोमासे हे दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन लहामेवाडी येथे आले.त्यांनी पत्नीला “नांदायला चल” असे सांगितले. मात्र अश्विनी यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने संतापाच्या भरात गंभीर पाऊल उचलले.
मुलींवर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न
आरोपीने धमकी देत दुचाकीवरील पिशवीतून डिझेलचा कॅन काढून आपल्या ५ वर्षांच्या मृणाल आणि ४ वर्षांच्या मृण्मय या चिमुरड्यांच्या अंगावर डिझेल ओतले. त्यानंतर काडीपेटी काढून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला.
वेळेवर मदत – अनर्थ टळला
या प्रकारामुळे अश्विनी आणि त्यांच्या आईने आरडाओरडा केला. आवाज ऐकून नातेवाईक आसाराम चिंचोलकर तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी आरोपीच्या हातातील डिझेलचा कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर आरोपीने पत्नी व माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

