माजलगाव — अंबाजोगाई येथे 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षापासून अत्याचार करून लग्नासाठी धर्म परिवर्तनाचा दबाव आणणची घटना ताजी असतानाच माजलगाव शहरात देखील एका महाविद्यालयीन तरुणीवर कॅफेमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही माजलगाव ग्रामीण भागातील असून ती शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या एका मैत्रिणीने शैक्षणिक साहित्य देण्याच्या कारणावरून तिला शहरातील कॅफेमध्ये बोलावले होते.
मात्र, मुलगी कॅफेमध्ये पोहोचल्यावर तिची मैत्रीण तिथे उपस्थित नव्हती. त्या ठिकाणी आरोपी रहमत अलीम शेख (रा. इंदिरानगर, माजलगाव) आधीपासूनच बसलेला होता.
कॅफेमध्येच अत्याचाराचा प्रयत्न
मुलगी मैत्रिणीची वाट पाहत असताना आरोपीने संधी साधून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कॅफेमध्ये उपस्थित काही तरुणांना हा प्रकार संशयास्पद वाटला.
त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत मुलीची सुटका केली. आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
‘लव्ह जिहाद’चा संशय; तपास सुरू
घटनेदरम्यान आरोपीच्या हातात हिंदू असल्याचा भास निर्माण करणारे गंडे-दोरे आणि कलावा आढळून आल्याने या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा कोन असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आरोपीने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता का? यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 79,POCSO कायदा कलम 8, 12, 126(2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये संताप
घटनेची माहिती शहरभर पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का?” असा सवाल उपस्थित
विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे
पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून, यामागे कोणती संघटित टोळी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

