बीड — नौकेतून प्रवास करायचा तर ती चांगली असावी लागते. मात्र त्या नौकेलाच स्वतःच्या हाताने भोक पाडून त्यावर स्वार होत पैलतीरावर नेण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मघात समजला जातो. हाच नियम राजकारणात देखील आहे. माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेली भूमिका.रस्त्यांची झालेली चाळणी, शेतकऱ्यांची साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेली पिळवणूक, पेशवाईच्या राजवस्त्रासाठी रघुनाथराव पेशव्यांसारखी पुतण्यासोबत खेळलेली घातकी चाल या गोष्टी घातक ठरू लागल्या आहेत. मतदारांनी इतके वर्ष ठेवलेला विश्वास आता पूर्ण उडाल्याने सोळंकेची नाव निवडणुकीच्या गर्तेत बुडणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.
प्रकाश सोळंके यांनी माजलगावच्या राजकारणात थोडं थोडं कर नव्हे तर वीस वर्षापासून आधीराज्य गाजवलं. जनतेने नेहमीच आता तरी सुधारणा करतील मतदार संघाचा कायापालट होईल अशी धारणा ठेवली मात्र ही भावना माजलगावकरांसाठी आत्मघातकी ठरली. मतदार संघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली. 90 ते 100 गावातील लोकांना जायला यायला धड रस्ता नाही. माजलगाव तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या मनूर देवी मंदिराचा माजलगाव- मनूर -गोविंदपूर – लूखेगाव या रस्त्यावरून जाणाऱ्यांना गुडघ्या एवढ्याल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. ढोपराची हाड या रस्त्यावरून जाताना खिळखिळी होतात. तीच स्थिती दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या माजलगाव मंजरथ रस्त्याची आहे. एकूणच पाहिलं तर हे धर्मकार्य विरोधीच भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे अशी भावना या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांची निर्माण होते. कालवा दुरुस्ती असो की उपसा जलसिंचन योजना असो याचे प्रत्येक काम स्थानिक गुत्तेदारांना कधीच दिले नाही. मतदारसंघा बाहेरील लोकांना ही काम देऊन कमिशन घेतल्याचा आरोप अनेक वेळा प्रकाश सोळंके यांच्यावर केला गेला. तीच स्थिती जलजीवन च्या कामात देखील झाली. येणाऱ्या काळात या कामात झालेल्या भ्रष्टाप्रचारामुळे अनेक गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही कर्तबगारी कमी की काय ? म्हणून पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनात वादग्रस्त भूमिका घेऊन समाजाला डिवचत वातावरण कलूषीत करण्याचं काम प्रकाश सोळंके यांनी केलं. राजकारणाच्या नौकेला त्यांनी स्वतःच्या हातानेच मोठं भगदाड पाडलं. याच पडलेल्या भगदाडामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेत त्यांचा चाहता वर्ग माजलगाव मतदार संघात मोठा असताना देखील आघाडी घेता आली नाही. परिणामी त्यांना कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाला देखील सोळंकेच्या कर्तबगारीची काळी किनार लागलेली आहे.
साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील गोरगरीब शेतकऱ्यांची जितकी पिळवणूक करता येईल तितकी पिळवणूक प्रकाश सोळंके यांनी केली. शेतकरी आंदोलन या भागात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तरी त्यांच्यावर काही प्रमाणात का होईना वचक राहिला. नाहीतर जुन्या काळातील सरंजामशहासारखं त्यांनी शेतकरी जात्यातून अक्षरशः दळून काढला असता. अशी परिस्थिती या भागात त्यांनी निर्माण करून ठेवली. अनेक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जावा यासाठी रक्ताचे अश्रू गाळावे लागले आहेत. हे शेतकरी कसा बरे विसरेल? जे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर त्यांची जी वर्तवणूक राहिली तीच वर्तवणूक स्वतःच्या घरात देखील राहिली. दिलेलं वचन पाळायचं नाही. घातकी राजकारण करत स्वतःची पोळी भाजायची एवढंच धोरण अजूनही कायमच ठेवलं. परिणामी लागलेल्या सवयीमुळे त्यांनी पेशवाईचा इतिहास कसा घडला होता. याचं उदाहरण देखील त्यांनी दाखवून दिलं. पेशवाईची राज वस्त्र अंगावर चढावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा घात केला होता. तशीच स्थिती यांनी देखील केली. राजकीय निवृत्तीची घोषणा करून उत्तराधिकारी आपला पुतण्या असल्याचं मोठ्या थाटात जाहीर केलं. त्यातून काही काळ का होईना मतदारसंघात त्यांचा मोठेपणा जनतेला भावला मात्र ऐनवेळी आमदारकीची राजवस्त्र स्वतःच्या अंगावरच राहावीत यासाठी राजकीय सारीपाटावर अनुभवी चाली खेळत पुतण्याचा पत्ता कट केला. स्वतःच्या नावाची (उमेदवारीची) घोषणा पक्षश्रेष्ठींना करायला लावली. इथंच सगळ्यात मोठं कधीच न बूजल्या जाणार आणखी एक भोक पडलं. या घटनेची सारवासारव करत त्यांचा पुतण्या राजकीय मंचावरून हा आमचा कौटुंबिक निर्णय होता. मी काकावर नाराज नाही असं सांगत असला तरी जनमताला मात्र हे पटलेलं नाही.
ही राजकीय नौकेला हाताने पाडलेली भोक नाहीत का? “बुंद से गई वो हौद से नही आती” अशी म्हण प्रचलित आहे. आठ दहा दिवसाच्या प्रचारकाळात न बुजवता येणारी भोकं सोळंके कशी बुजवणार? राजकीय नौका निवडणुकीच्या पैल तीरावर कशी पोहोचणार? ती गर्तेतच बुडणार असल्याचं सध्या तरी चित्र माजलगाव मतदार संघात दिसत आहे. सोळंकेच्या नौकेत पाणी शिरत असून नौका बुडण्याच्या मार्गावर आली आहे.सोळंके विरोधात वातावरण प्रचंड तापू लागलं आहे.