नवी दिल्ली –कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते.या लॉकडाऊनचा परिणाम जगभरातच नाही तर चंद्रावरही पडल्याची नवी माहिती समोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल चंद्राचा काय संबंध तर भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात याचं उत्तर मिळालं आहे.
कोरोना संकटाच्या काळात चार वर्षांपूर्वी अख्खं जगच लॉकडाऊन झालं होतं. या काळात लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हतं. याच काळात प्रकृती मात्र स्वतः ला रिसेट करत होती. प्रदूषण कमी झालं. हवा स्वच्छ झाली. ज्यावेळी अख्खी पृथ्वीच कोरोनाच्या विळख्यात अडकली त्याच वेळी पृथ्वीचा उपग्रह चंद्र सुद्धा थंड पडला होता. भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की एप्रिल-मे 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात चंद्रावरील तापमानात मोठी घट झाली होती. रॉयल एस्ट्रोनोमिकल सोसायटी: लेटर्स च्या मासिक अभ्यासात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात अतिशय घनिष्ट संबंध आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या रिसर्चर्सने नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) डेटाची मदत घेतली. त्यांनी 2017 ते 2023 दरम्यान चंद्रावरील सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत नेमके काय बदल होतात याचा अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की लॉकडाऊनच्या दरम्यानच्या तापमानात बाकी वर्षांतील त्याच काळातील (एप्रिल – मे) तापमानाच्या तुलनेत 8 ते 10 केल्विन इतकी घट झाली होती.
पृथ्वीवर लॉकडाऊन पण चंद्र का गारठला?
कोरोना लॉकडाऊनच्या काळात पृथ्वीवर सगळं काही ठप्प झालं होतं. कंपन्या, कारखाने पूर्ण बंद होते. रस्त्यावर वाहतूकही दिसत नव्हती. त्यामुळे या काळात वायु प्रदूषण अतिशय कमी झालं होतं. अब्जावधी माणसे घरात कैद झाली होती. त्यामुळे ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनात कमालीची घट नोंदवण्यात आली. याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या वायुमंडळात कमी उष्मा राहिला आणि नंतर उत्सर्जित झाला. PRL चे अभ्यासक मानतात की लॉकडाऊनमुळे पृथ्वीच्या रेडिएशनमध्ये घट झाली. यामुळे चंद्रावरील तापमानात घट होऊ लागली. चंद्र एक प्रकारे पृथ्वीच्या रेडिएशन सिग्नेचरच्या ऍम्प्लिफायर प्रमाणे काम करतो.
लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा वाढला पारा
अभ्यासकांनी तर 12 वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला परंतु अहवालात सात वर्षांच्या (2017-2023)माहितीचा वापर केला. म्हणजे लॉकडाऊनच्या तीन वर्षे आधी आणि तीन वर्षांनंतरच्या तापमानाच्या माहितीचा समावेश करण्यात आला. 2020 मध्ये साईट 2 वर सर्वात कमी तापमान 96.2 K इतके होते. तर 2022 मध्ये साईट 1 वर सर्वात कमी 143.8 K तापमानाची नोंद करण्यात आली होती. साधारणपणे 2020 मध्ये बहुतांश ठिकाणी तापमान कमीच राहिले. नंतर पृथ्वीवर लॉकडाऊन जसजसे हटत गेले तसतसे चंद्रावर उष्णता वाढत गेली.
चंद्रावरील तापमान घटण्यात सौर घडामोडीही कारणीभूत ठरू शकल्या असत्या. परंतु अभ्यासकांनी अन्य कारणांचाही अभ्यास केला होता. मात्र यातील कशाचाच प्रभाव चंद्रावरील तापमान कमी होण्यास कारणीभूत ठरला नाही. त्यामुळे फक्त लॉकडाऊनमुळेच चंद्रावरील तापमान कमी झालं असाव या निष्कर्षापर्यंत भारतीय वैज्ञानिक येऊन पोहोचले.