बीड — भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बीड रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे. त्या अनुषंगाने बीड आंबेडकरी समूहाने एकत्रित येवून गुरुवार (दि.26) सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले आहे. त्यानंतर आंबेडकरी समूहांने बीड जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन नावाची नोंद घ्यावी असे निवेदन दिले.
आंबेडकरी समूहाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अवघा देश चालतो आहे. त्या व्यक्तीच्या नावाला कोणीही विरोध करता कामा नये. तसेच रेल्वे आल्याचे श्रेय लोकप्रतिनिधींनी घेऊ नये कारण प्रत्येक नागरिकाच्या टॅक्समधून बीड रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. परळी तालुक्यापर्यंत रेल्वे होती. मात्र सदरील रेल्वे बीडपर्यंत येण्यास प्रदीर्घकाळ लागला आहे. बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की,आबेडकरी समूहाचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्र सरकारला प्रत्येक्ष भेटणार आहे. या निवेदनावर शेकडो आंबेडकरी जनतेच्या स्वाक्षरी आहेत.
पोलिसांनाही दिलेले निवेदन
बीड रेल्वे स्थानकास आंबेडकरी समूहांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देऊन तसा नाम फलक लावला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या नाम फलकाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी आणि काळजी घ्यावी.त्याकरीता पोलीस संरक्षण द्यावे अशा मागणीचा निवेदन आंबेडकरी समूहाने पोलीस प्रशासनास दिलं आहे.