बोगस शिक्षक भरती घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमध्ये वेतन बंदचे आदेश; बीडच्या चंपावती विद्यालयाचा नंबर कधी?

Spread the love

बोगस शिक्षक भरती घोटाळा – छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ ते ६ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू; बनावट शालार्थ आयडी आणि बोगस नियुक्त्यांवर शिक्षण विभागाचा बडगा, मग बीडमधील चंपावती प्रकरणात कारवाई कधी?

छत्रपती संभाजीनगर — बोगस शिक्षक भरती, बनावट शालार्थ आयडी आणि कागदोपत्री विद्यार्थी संख्या वाढवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने अखेर कारवाईचे पाऊल उचलले आहे. हरसूल-पिसादेवी रोडवरील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री संत भगवान बाबा प्राथमिक शाळेतील कथित बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती ५ ते ६ कोटी रुपयांपर्यंत असल्याची तक्रार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरवदे यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शाळेचे वेतन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे राज्यातील शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, बीडच्या चंपावती विद्यालयातील कथित गैरव्यवहारावर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Bogus Shikshak Bharti Ghotala 6 Crore Scam Chhatrapati Sambhajinagar Beed

१५ ते २० बोगस शिक्षकांच्या नियुक्त्यांचा संशय

छत्रपती संभाजीनगरमधील बोगस शिक्षक भरती घोटाळा  प्रकरणात १५ ते २० शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. शासकीय रजिस्टरमध्ये बनावट आवक-जावक क्रमांक नोंदवणे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून नियुक्तीची कागदपत्रे तयार करणे, त्यानंतर शालार्थ आयडी मिळवून वेतन सुरू करणे, असा संपूर्ण प्रकार तक्रारीत मांडण्यात आला आहे.

बोगस विद्यार्थी दाखवून संचमान्यता मिळवल्याचा आरोप

शासनाच्या सरल (SARAL) पोर्टलवर आणि स्टुडंट कॅटलॉगमध्ये प्रत्यक्षात शाळेत उपस्थित नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची नोंद केल्याचा आरोप आहे. या विद्यार्थी संख्येच्या आधारे संचमान्यता मिळवून शिक्षकांची पदे निर्माण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतलेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांचे पालकांच्या संमतीशिवाय कागदोपत्री स्थलांतर केल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.

शासकीय तिजोरीला ६ कोटींचा फटका?

बोगस शिक्षक भरती घोटाळा हा बनावट नियुक्त्यांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या शालार्थ आयडीद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील खात्यांवर वेतन जमा करून ते काढण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतून ५ ते ६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघरत्न सरवदे यांचे वेतन बंदचे आदेश

बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. समितीला २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरवदे यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शाळेचे वेतन थांबवण्याचे आदेश अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी (प्राथमिक) यांना दिले आहेत.

बीडच्या चंपावती विद्यालयाचा नंबर कधी?

छत्रपती संभाजीनगरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणात वेतन बंद करण्याचे आदेश निघाले असताना बीडच्या चंपावती विद्यालयातील कथित गैरव्यवहाराचा विषयही पुन्हा ऐरणीवर आला आहे. चंपावती विद्यालयासंदर्भात शिक्षण विभागाच्या अहवालातून गंभीर अनियमितता समोर आल्याचा मुद्दा यापूर्वीच उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात किती प्रगती झाली, हा प्रश्न कायम आहे.

उत्तराखंडचे विद्यार्थी खरेदी केल्याच्या प्रकरणावरून शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत मुख्याध्यापक सारंग जोशी दोशी आढळले. यानंतर गुन्हा दाखल करण्याची मानसिकता नसताना तसेच या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला मात्र माध्यमांच्या दबावामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सारंग जोशी विरोधात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी चंपावती विद्यालयाला तपास कामात भेट दिली मात्र कागदपत्रे जप्त करत असताना कपाटाच्या चाव्या फरार असलेल्या मुख्याध्यापकाच्या खिशात असल्याने पोलिसांनी संबंधित कपाट सील केले. शाळे सदर्भात पालकांच्या अडीअडचणी लक्षात घेता शिक्षण विभागाने तक्रार करून देखील आपली जबाबदारी झटकत हात वर केल्याचं निदर्शनास येत आहे. चंपावती विद्यालयात देखील नुसती विद्यार्थी खरेदी प्रकरण घडलं नाही तर बोगस शिक्षक भरती घोटाळा देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे तो लवकरच “सह्याद्री माझा” च्या माध्यमातून उघड करण्यात येणार आहे.

बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात  एका जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीच्या तक्रारीनंतर वेतन रोखण्याचे आदेश निघत असतील, तर बीडमधील चंपावती विद्यालयाच्या प्रकरणातही चौकशी अहवालानुसार ठोस निर्णय कधी होणार? संबंधित जबाबदारांवर कारवाई होणार की प्रकरण केवळ कागदोपत्री चौकशीपुरतेच मर्यादित राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

सादिक इनामदार यांचा आंदोलनाचा इशारा

भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभियंता सादिक बाबालमिया इनामदार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील प्रकरणी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शासनाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक आणि गैरव्यवहारात सहभागी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दोषींना निलंबित करावे आणि शासनाची अपहारित रक्कम त्यांच्या मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात येत्या सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बोगस शिक्षक भरती घोटाळ्यांमुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कारवाईनंतर आता बीडच्या चंपावती विद्यालयाच्या प्रकरणातही शिक्षण विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

अधिक माहिती:

हे पण वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *