Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. हे खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींनंतर ठाकरे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार टीका करत त्यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला आहे. तसेच त्यांना धडा शिकवण्याची भाषा त्यांनी केली आहे.
दरम्यान, 19 जून रोजी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदारांच्या संभाव्य प्रवेशामुळे या कार्यक्रमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मुंबईतील नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ठाकरे गटातील काही खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख आणि ओमराजे निंबाळकर या नावांची चर्चा आहे.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शिंदे गटाच्या नेस्को येथील कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही गटांचे आक्रमक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिस यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.