Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गंभीर आरोप करत, मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावा केला.
आव्हाड यांनी आरोप केला की, तुकाराम मुंढे यांनी FDA विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर औषध, अन्नपदार्थ आणि भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू केली. त्यामुळे काही माफिया आणि लॉबी सक्रिय झाल्या असून त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
“मुंढे यांच्या विरोधात ड्रग्ज लॉबी, काही बड्या कंपन्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची लॉबी काम करत आहे,” असा आरोप करत आव्हाड यांनी सरकारला जाब विचारला. महाराष्ट्रात गुटखा आणि भेसळीचे प्रकार कसे सुरू आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अन्न आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. नमुने फेल करण्यापासून ते सेटलमेंटपर्यंत मोठे रॅकेट असल्याचा दावा त्यांनी केला. या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“या प्रकरणातील मोठी नावे पुढील आठवड्यात उघड करणार,” असा इशाराही आव्हाड यांनी विधानसभेत दिला.
दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनीही या विषयावर भूमिका मांडत तुकाराम मुंढे यांना धमक्या येत असल्याचा दावा केला. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. “तुकाराम मुंढे यांच्या नावातील टी म्हणजे टायगरमधील टी आहे,” असे म्हणत त्यांनी मुंढे यांना किमान तीन वर्षे पदावर ठेवण्याची भूमिका मांडली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारची बाजू मांडत सध्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.
“मुंढे FDA मध्ये चांगले काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून धडक कारवाई सुरू आहे,” असे झिरवाळ यांनी सांगितले. मात्र विभागाकडे पुरेशी साधनसामग्री, वाहने आणि सुविधा नसल्याची कबुली देत लवकरच त्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.