Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

लातूर — नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या लातूर शहरात आता आणखी एक मोठा प्रशासकीय निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, वस्त्रालयं आणि इतर व्यावसायिक उपक्रमांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हा उद्योग केंद्राने संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे लातूरच्या प्रसिद्ध ‘क्लास संस्कृती’त मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीमधील जागांचा मूळ उद्देश उद्योग उभारणीचा होता. मात्र गेल्या अनेक वर्षांत उद्योगांऐवजी कोचिंग क्लासेस आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले. जवळपास २७ एकर परिसरातील अनेक भूखंडांवर औद्योगिक प्रकल्प उभे राहण्याऐवजी ट्युशन क्लासेस, विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम सुरू झाले.
या संदर्भात २०११ पासून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. काही वेळा कारवाईची आश्वासनं देण्यात आली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईदेखील झाली. मात्र परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याची नाराजी तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी उद्योगांसाठी विकसित करण्यात आलेला हा परिसर आता संपूर्ण राज्यात ‘ट्युशन एरिया’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. मोठमोठे उद्योग बंद पडत गेले आणि त्यांच्या जागी खासगी कोचिंग क्लासेसचे जाळे निर्माण झाले. अनेक नामांकित कोचिंग संस्थांनी येथे आपली केंद्रे सुरू केली असून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये दाखल होत आहेत.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयकडून अटक झाल्यानंतर लातूरच्या क्लास संस्कृतीवर टीकेची झोड उठली होती. पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर प्रकरणानंतर ‘लातूर पॅटर्न’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनाच्या या कारवाईनंतर पालकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे ही व्यवस्था अचानक बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे. तर काहींनी औद्योगिक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रशासनाच्या नव्या आदेशानंतर लातूर औद्योगिक वसाहतीतील कोचिंग व्यवसायांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.