बीड कारागृह मधील फोन कॉल प्रकरणाला नवे वळण !
बीड कारागृह मधील फोन कॉल प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तीन वेगवेगळ्या पथकांनी कारागृहाची कसून चौकशी केली असता कोणताही दोष आढळून आला नाही. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कारागृह अधीक्षकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्ड आणि कैद्यांचे जबाब तपासले आहेत. प्राथमिक अहवालानुसार सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचे समोर आले आहे. तरीही प्रशासनाने खबरदारी म्हणून नवीन नियम लागू केले आहेत. बीड कारागृहात आता अधिक कडक तपासणी केली जाणार आहे. कारागृह महानिरीक्षक लवकरच बीड दौऱ्यावर येणार आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे आणि पुढील कार्यवाही लवकरच निश्चित केली जाईल तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत सुरक्षा वाढवण्यासाठी तात्काळ……
बीड — विलास घुले मृत्यू प्रकरणावरून चर्चेत आलेल्या बीड जिल्हा कारागृहातील कथित मोबाईल वापर आणि फोन कॉल प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड याच्यावर कारागृहातून फोन करून कट रचल्याचा आरोप केल्यानंतर तीन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकांनी कारागृहाची तपासणी केली. या पथकांच्या चौकशीत कारागृहातून कट रचल्याचे किंवा सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्याचे निष्पन्न झाले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, या अहवालांबाबत कारागृह प्रशासनाने अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही.

तीन स्वतंत्र पथकांकडून कारागृहाची झाडाझडती
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्याशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले होते. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आपला मुलगा सौरव याला गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला होता. कराड याने कारागृहातून मोबाईलचा वापर करून बाहेर संपर्क साधल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय देशमुख यांनी कारागृह प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या. छत्रपती संभाजीनगर कारागृह अधीक्षकांचे दक्षता पथक, पुण्यातील विशेष दक्षता पथक आणि कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहाची स्वतंत्रपणे पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक यंत्रणेची तपासणी
या तिन्ही पथकांनी कारागृहातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, कैद्यांच्या भेटींची नोंद, फोन कॉल प्रणाली आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली. विशेषतः वाल्मीक कराड याच्या कोठडीच्या परिसरातील १२ हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि संबंधित दस्तऐवज तपासण्यात आल्याची माहिती आहे.
या तपासणीनंतर तिन्ही पथकांनी अहवाल तयार केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत कारागृहातून मोबाईलचा गैरवापर झाल्याचे, कट रचल्याचे किंवा सुरक्षा व्यवस्थेत अनियमितता असल्याचे पुरावे आढळले नाहीत. मात्र, या निष्कर्षांची अधिकृत प्रत सार्वजनिक झालेली नसल्याने अंतिम निष्कर्षाबाबत अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.
कारागृह महानिरीक्षकांची भेट लांबणीवर
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई हे बीड जिल्हा कारागृहाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार होते. मात्र, शासकीय बैठका आणि इतर तातडीच्या कामांमुळे त्यांचा नियोजित दौरा होऊ शकला नाही. आपण लवकरच बीड कारागृहाला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती योगेश देसाई यांनी दिल्याचे समजते.
तीन समित्यांचे अहवाल तयार झाले असले, तरी त्यातील निष्कर्षांबाबत वरिष्ठ स्तरावरून अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
कैद्यांचे फोन कॉल बंद; भेटीसाठी दोनच पर्याय
दरम्यान, कारागृहातून बाहेर संपर्क साधला जात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील महिनाभरापासून कारागृहातील फोन कॉलची सुविधा बंद करण्यात आली आहे.
आता कैद्यांच्या नातेवाईकांना संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. कारागृहातील गैरप्रकार रोखणे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले.
बीड जिल्हा कारागृहाबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तीन समित्यांनी चौकशी केली असून त्यांचे अहवाल वरिष्ठांना सादर केले जाणार आहेत. मात्र, चौकशीचे निष्कर्ष किंवा अहवालाबाबत आपल्याला सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे चांदणे यांनी स्पष्ट केले.
एकीकडे तीन पथकांच्या तपासात दोष आढळला नसल्याची माहिती, तर दुसरीकडे कारागृहातील फोन कॉलची सुविधा बंद करण्याचा निर्णय, यामुळे बीड कारागृहातील हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आता कारागृह महानिरीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आणि अधिकृत अहवालातून काय स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग
बीड जिल्हा प्रशासन
बीड जिल्ह्यातील बातम्या
सह्याद्री माझा – मुख्य पान