अंबाजोगाई — तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी (११ जुलै) रात्री भररस्त्यात एका २३ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने तसेच दगड-विटांनी मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर वाकडे (वय २३, रा. पट्टीवडगाव) असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूरहून पट्टीवडगावकडे जात होता. दरम्यान, अण्णाभाऊ साठे चौकात काही जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी दोघांवर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात ज्ञानेश्वर वाकडे गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर हल्ल्यामागील कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

