Home क्राईम विहिरीत सापडला नवविवाहितेचा मृतदेह; सासरच्यांवर खुनाचा आरोप

विहिरीत सापडला नवविवाहितेचा मृतदेह; सासरच्यांवर खुनाचा आरोप

0
7

बीड. — तालुक्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा गंभीर आरोप करत संबंधितांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटेवाडी येथील संध्या पवन कुटे (वय 23) या नवविवाहितेचा मृतदेह सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतरही सासरच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तेथे उपस्थित नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

यामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदनास परवानगी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आले होते. दुपारपर्यंत या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू होती.

पोलिसांकडून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here