Home क्राईम अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण 6.40 लाखांची लाच घेताना बीड एसीबीच्या जाळ्यात

अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण 6.40 लाखांची लाच घेताना बीड एसीबीच्या जाळ्यात

0
14

बीड — अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून वाळू माफिया आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमधील आर्थिक साटेलोटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या मालकीच्या पोकलेन मशीन आणि सहा हायवा ट्रकद्वारे सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने दरमहा 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम मागितल्याने तक्रारदाराने बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला. चर्चेनंतर 7 लाख रुपयांऐवजी 6 लाख 40 हजार रुपये देण्याचे ठरले. शनिवारी ही रक्कम स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण यांना एसीबीने रंगेहात पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून केला जात आहे.

यापूर्वीही निलंबनाची कारवाई

विजय चव्हाण याच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले होते. मार्च 2024 मध्ये अब्दीमंडी (छत्रपती संभाजीनगर) येथील सुमारे 250 एकर जमीन फेरफार आणि विक्री प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता बेकायदेशीर कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत शासनाने त्यांना निलंबित केले होते. त्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा लाचखोरीच्या आरोपात अटक झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महसूल विभागातील भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी शासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात असताना, काही अधिकारीच अशा कारवायांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेत असल्याचे समोर येत आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर संबंधित साखळीतील इतर अधिकारी आणि दलालही चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे वाळू माफियांना संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसीबीच्या रडारवर आणखी काही संशयित अधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here