मुंबई — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आंदोलकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मृत आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी भर उन्हात बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे 14 तासांनंतर उपोषण स्थगित केले. यावेळी सरकारला मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने मराठा समाजासाठी सलग महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना एमआयडीसीमध्ये (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. तसेच विविध आंदोलनांतील उर्वरित 34 मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये एकूण 8 महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे.
मराठा समाजाला मिळणाऱ्या 8 प्रमुख सवलती
1) शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार.
2) चालक व वाहक प्रशिक्षण योजना
रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मराठा समाजातील युवकांसाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार.
3) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
इयत्ता 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांना मिळणारी विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा समाजासाठीही लागू करण्यात आली आहे.
4) शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
विविध व्यावसायिक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार.
5) परराज्यातील शिक्षणासाठी लाभ
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी इतर राज्यांतील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार.
6) सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता
OBC विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि योजनांप्रमाणेच सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र राहतील.
7) संस्थास्तरावरील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ
CAP प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर किंवा संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती मिळतील.
8) भविष्यातील OBC सवलती आपोआप लागू
भविष्यात OBC प्रवर्गासाठी जाहीर होणाऱ्या नवीन शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ स्वतंत्र आदेशाशिवाय मराठा समाजालाही मिळणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनानंतर सरकारची मोठी पावले
मराठा समाजासाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे शिक्षण, रोजगार आणि आर्थिक मदतीच्या क्षेत्रात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयांकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.




