Home क्राईम परळीत मित्रांनीच केला मित्राचा खून; पैशांच्या वादातून हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर...

परळीत मित्रांनीच केला मित्राचा खून; पैशांच्या वादातून हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

0
7

बीड —  जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत केला आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत असलेल्या या प्रकरणात मृताच्या दोन मित्रांनीच पैशांच्या व्यवहारातून वाद झाल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदारनगर, परळी वैजनाथ येथील अफजलखान उर्फ तोहीद कैरातीखान पठाण (वय 36) हे 31 मे 2026 रोजी त्यांच्या मित्रांसोबत बाहेरगावी गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दरम्यान, 1 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळून आला.


घटनास्थळावरील परिस्थिती पाहता सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे वाटत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा बारकाईने तपास सुरू ठेवला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, मृताच्या नातेवाईकांचे जबाब, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
तपासादरम्यान पोलिसांना अफजलखान पठाण यांची हत्या त्यांच्या मित्रांनीच केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ऋषीकेश परमेश्वर फड (वय 27, रा. सोमेश्वर नगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (वय 26, रा. स्नेहनगर, परळी) यांचा शोध सुरू करण्यात आला.
3 जून रोजी हे दोन्ही संशयित परळीत आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी पैशांच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून अफजलखान पठाण यांची दगडाने मारून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर टाकल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. ही मोहीम प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड, पोउपनि सुशांत सुतळे, आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, नितीन वडमारे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here