नेकनूर — मुलगी पाहण्यासाठी सोबत येण्यास नकार दिल्याच्या कारणावरून 21 वर्षीय तरुणावर तिन जणांनी हल्ला केला, तर त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पती-पत्नीलाही मारहाण करण्यात आल्याची घटना लिंबागणेश येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा रामदास थोरात हा 18 मार्च रोजी रात्री बाजारतळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता. त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात यांनी त्याला रस्त्यात अडवून एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. मात्र घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने जाण्यास नकार दिला. या साध्या कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
आरोपींनी कृष्णाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी गजाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेदरम्यान आरडाओरडा ऐकून महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दिपाली थोरात हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य करत मारहाण केली. दिपाली यांच्या हातावर काठीने मारण्यात आले, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून इतक्या गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जखमी कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

