बीड — वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे चौघांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी संगनमत करून अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना गिरामनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पंजाब पांडुरंग शिंदे वय 33, रा. गिरामनगर, पांगरी रोड, बीड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड हे दोघेही रा. उखंडा, लिंबादेवी, ता. बीड, बालाजी बहिरवाळ रा. धानोरा रोड, बीड, मयूर खोमणे चऱ्हाटा फाटा, बीड अशी अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
रात्री सव्वा नऊला घरी असताना दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड बालाजी बहिरवाळ व मयूर खोमने या चौघांनी घराबाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून त्यांना नगर रोडवरील देवराज बारमध्ये नेण्यात आले. तेथे आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी करत पुन्हा एकदा मारहाण केली.यावेळी बालाजी बहिरवाळ याने बीअरच्या बाटलीने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मारहाण झाल्यानंतर शिंदे यांनी जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेत बारमधून पळ काढला व जवळील स्टोन क्रशरवर लपून बसले.काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी आरोपी दिनेश ठोसर, विठ्ठल गायकवाड, बालाजी बहिरवाळ व मयुर खोमणे यांच्या विरोधात अपहरण, मारहाण, जबरदस्ती, खंडणी मागणी व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

