बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबरला घडल्यानंतर वाल्मीक कराड फरार असून शेवटचं लोकेशन उज्जैन पोहचला होता. त्याने उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर काढलेला फोटोही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही त्याच्यासोबत होते. दरम्यान वाल्मीक कराड वर तब्बल 26 गुन्हे नोंद असूनही पोलीस अंगरक्षक असल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
संतोष देशमुख हत्येनंतर व खंडणी प्रकरणाचे सीआयडी या धागेदोरे खंगाळत आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत. तसेच, कराडला दोन पोलिस अंगरक्षक देखील आहेत. बीड पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला अहवालामध्ये ही माहिती नमूद आहे. बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंह पंडित, नमीता मुंदडा यांना अद्याप अंगरक्षक नाहीत.तर अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनवणे, मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांना एक पोलिस अंगरक्षक आहे. धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत.दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे वाल्मिक कराड लवकरच पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

