Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

Beed Rapido Bike Taxi सेवा बीडमध्ये विनापरवाना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे….
विपुल पिंगळे यांच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; एका दिवसात आरटीओने स्पष्ट केली भूमिका, नागरिकांना सेवा न वापरण्याचे आवाहन
बीड : बीड शहरात प्रवाशांची वाहतूक करणारी रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा विनापरवाना सुरू असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकृत निवेदनातून स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यासाठी कंपनीने आवश्यक ॲग्रीगेटर परवाना घेतलेला नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. युवासेनेने हा मुद्दा थेट परिवहन मंत्र्यांच्या दरबारात मांडल्यानंतर अवघ्या एका दिवसात विभागाने भूमिका स्पष्ट केल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी २९ ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. बीडमध्ये रॅपिडोच्या माध्यमातून बाईक टॅक्सी सेवा सुरू असताना कंपनीकडे प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक परवाना आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बीडने ३० ऑक्टोबर रोजी अधिकृत वृत्तनिवेदन प्रसिद्ध केले. त्यात रॅपिडो कंपनीने बीड जिल्ह्यासाठी बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात कोणताही वैध ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२६ मधील नियम ४(११) नुसार वैध परवान्याशिवाय वाहन किंवा चालकांची ॲपवर नोंदणी करणे आणि प्रवासी वाहतूक सेवा चालविणे नियमबाह्य असल्याचे परिवहन विभागाने नमूद केले आहे. संबंधित कंपनीविरोधात नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
युवासेनेने केवळ परवान्यापुरताच प्रश्न मर्यादित न ठेवता बाईक टॅक्सी सेवेतील सुरक्षेच्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधले होते. महिला प्रवाशांची सुरक्षितता, चालकांची ओळख व पार्श्वभूमी पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन, विमा संरक्षण आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी असलेली यंत्रणा याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
परिवहन विभागाने बीड जिल्ह्यातील नागरिकांना रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच दुचाकी वाहनमालकांनी आपली वाहने या ॲपवर नोंदवू नयेत, असेही स्पष्ट केले आहे.
युवासेनेच्या तक्रारीनंतर परिवहन विभागाने अवघ्या २४ तासांत अधिकृत भूमिका मांडली आहे. आता संबंधित कंपनीवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे. शहरातील बाईक टॅक्सी सेवेच्या कायदेशीर वैधतेचा प्रश्न उपस्थित करून युवासेनेने परिवहन विभागाला उत्तर देण्यास भाग पाडले आहे.
महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये नवीन ॲग्रीगेटर नियम लागू केले आहेत. यानुसार कोणत्याही कंपनीला बाईक टॅक्सी सेवा सुरू करायची असेल तर त्यांना परिवहन विभागाचा ॲग्रीगेटर परवाना घेणे बंधनकारक आहे. बीडमध्ये Beed Rapido Bike Taxi ने हा परवाना घेतला नसल्याने ही सेवा बेकायदेशीर ठरत आहे.
अधिकृत माहितीसाठी: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण वाचा: बीड जिल्ह्यातील इतर ताज्या बातम्या वाचा सह्याद्री माझा वर