आष्टी — कर्ज फेडण्याची चिंता, सावकारांकडून पैशांसाठी होणारा सततचा तगादा आणि मर्यादित वेतनात कुटुंबाचा खर्च भागविण्याची आर्थिक कसरत, या विवंचनेतून आष्टी एसटी आगारातील चालकाने जीवन संपवल्याची घटना घडली. अन्सार हबीब शेख (वय ४६, रा. साबलखेड) असे मृत चालकाचे नाव आहे.
शेख हे आष्टी एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. रात्रीच्या सुमारास आष्टी बसस्थानकातील विश्रांती कक्षात ते मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी कर्मचाऱ्यांसह परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
शेख हे काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. कर्जाची परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच कर्जाच्या पैशांसाठी सावकारांकडून वारंवार होणारा तगादा आणि कमी वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता.
कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागील आर्थिक व्यवहार आणि इतर कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. आष्टी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

