बीड — जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने बीड शहरात मोठी कारवाई करत तब्बल 70 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 35 लाख रुपयांचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 15 लाख रुपयांची क्रेटा कार असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक बीड शहरात गस्त घालत असताना खासबाग मंदिर रोड परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून अवैध गांज्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता, विविध गोण्यांमध्ये भरून ठेवलेला 70 किलो गांजा आढळून आला.
या प्रकरणात मोसीन खान वाहब शेख (वय 31, रा. ताज नगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 अंतर्गत NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीड शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या ही धडक कारवाई पार पाडली.




