Home क्राईम नांदूरघाट ग्रामपंचायतीत १.०३ कोटींचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा

नांदूरघाट ग्रामपंचायतीत १.०३ कोटींचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा

0
10

केज — तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या विकासकामांमध्ये तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासकीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशी समितीने पाच जणांना जबाबदार धरत त्यांच्या वाट्याची रक्कम निश्चित केली होती. त्यानंतर तिघांनी रक्कम शासकीय खात्यात जमा केली; मात्र ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपये न भरल्याने ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूरघाट ग्रामपंचायतीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने विशेष चौकशी समिती नियुक्त केली होती.

समितीने ग्रामपंचायतीचे कागदपत्रे, आर्थिक व्यवहार तसेच प्रत्यक्ष विकासकामांची तपासणी केली. या तपासणीत १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. चौकशीअंती सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शाखा अभियंता आणि तांत्रिक अधिकारी अशा पाच जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.

आठ दिवसांची मुदत; तिघांनी भरली रक्कम

प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्या वाट्याची रक्कम आठ दिवसांत शासकीय खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.

या कारवाईनंतर सरपंच सुनीता युवराज जाधव यांनी ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांनी ८ लाख ७ हजार ५९९ रुपये, तर शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे यांनी ४ लाख १५ हजार १५३ रुपये जमा केले.

या तिघांनी मिळून ४५ लाख ३७ हजार ८९९ रुपये नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या मग्रारोहयो बँक खात्यात जमा केले.

५८.५१ लाखांचा भरणा न झाल्याने पोलिसांत धाव

दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी भगवान यादव सिरसट यांच्या वाट्याची २५ लाख ३६ हजार ४३४ रुपये, तर ग्रामरोजगार सहाय्यक सादेक दिलावर शेख यांच्या वाट्याची ३३ लाख १५ हजार १४७ रुपये रक्कम मुदत संपूनही जमा झाली नाही.

दोघांकडून एकूण ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपये वसूल न झाल्याने अखेर प्रशासनाने फौजदारी कारवाईचा मार्ग स्वीकारला.

केज पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विजयकुमार रामभाऊ मस्के यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भगवान यादव सिरसट आणि सादेक दिलावर शेख यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या कामांमध्ये झालेल्या या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उर्वरित रकमेच्या वसुलीसह पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here