अंबाजोगाई — शेतजमिनीच्या फेरफाराची नोंद महसूल दप्तरी करून देण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील मंडळ अधिकारी सतीश विठ्ठलराव भुसेवाड यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराला आपल्या शेतीच्या फेरफार नोंदी महसूल दप्तरी करून घ्यायच्या होत्या. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी भुसेवाड यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने लाच मागितल्याच्या आरोपाची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये फेरफार नोंदीच्या कामासाठी भुसेवाड यांनी 1 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाईची तयारी केली. मात्र, ऐनवेळी मंडळ अधिकारी भुसेवाड यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाच स्वीकारल्याची कारवाई होऊ शकली नसली, तरी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसारख्या महसूल विभागातील नियमित कामासाठीच तब्बल 1 लाख रुपयांची मागणी झाल्याने या कारवाईने अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.




