कडा — उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील नागरिकांनी आंदोलन करत संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
या घटनेच्या निषेधार्थ कडा शहरातील नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी ‘पटवा हटवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. निषेध म्हणून शहरातील काही भागांतील दुकाने बंद ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, या आंदोलनानंतर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाने डॉ. महेंद्र रसिकलालजी पटवा यांच्यावर संस्थात्मक कारवाई केली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष योगेश सुमतीलालजी भंडारी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र १ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे तरुणीच्या आरोपानंतर सुरू झालेल्या या प्रकरणात आता संस्थेच्या पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीला आमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदावरूनही हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची भूमिका आहे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रकरणात आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे तरुणीने केलेल्या आरोपांमागील वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे कडा शहरासह परिसराचे लक्ष लागले आहे.




