Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — मांजरसुंबा घाट परिसरात कार अडवून एका व्यक्तीचे अपहरण, मारहाण, दरोडा आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांची लूट केल्याच्या गंभीर गुन्ह्यात नेकनूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (वय 50, रा. वालवड, ता. भूम, जि. धाराशिव) हे कुटुंबीयांसह चारचाकी वाहनाने वालवड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मांजरसुंबा घाटातील बळीराजा हॉटेल परिसरात आरोपींनी स्कॉर्पिओ आडवी लावून त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने आरोपींच्या वाहनात बसवून मारहाण करण्यात आली.
एफआयआरनुसार, आरोपी उदयसिंह उर्फ सोनू सत्यजित सिंह जाधव रा. गणेगाव ता. भूम जि. धाराशिव याने फिर्यादीला “तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता व एफडी माझ्या नावावर कर” असा दम देत दबाव टाकला. विरोध केल्यानंतर फिर्यादीच्या हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी आणि खिशातील 40 हजार रुपये रोख हिसकावून घेण्यात आले.
यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या एटीएम (ATM) कार्डचा पिन जबरदस्तीने विचारून घेतला. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, निखील नावाच्या आरोपीने ध्येय साकत हॉटेल येथील स्वाइप मशीनद्वारे 40 हजार रुपये काढल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल ताब्यात घेऊन गुगल पे (Google Pay )चा पासवर्ड मिळविला. त्याद्वारे ‘सुरज ऑनलाइन सर्व्हिस सेंटर’ आणि ‘नीता मल्हारी नागटिळक’ यांच्या खात्यावर प्रत्येकी 25 हजार रुपये, असे एकूण 50 हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
त्यानंतर फिर्यादीला गणेगाव (ता. भूम) येथे नेऊन काही काळ डांबून ठेवण्यात आले आणि वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी उदयसिंह उर्फ सोनू सत्यजित सिंह जाधव रा. गणेगाव ता. भूम जि. धाराशिव, अजहर सय्यद, निखिल (पूर्ण नाव माहित नाही) रा. बेलगाव, पिंपळगाव ता. भूम व अन्य अनोळखी दोघा विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 277/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 310(2), 308(2), 140(3), 127(2), 127(6), 115(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी स्वतंत्र तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी राहुल काळे व बाबू काळे (रा. भूम) या दोन आरोपींना भूम तालुक्यातील पारधी पिढीतून ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली विदवान कांबळे, विशाल क्षीरसागर, तसेच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश शिंदे आणि पोलीस हवालदार क्षीरसागर यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.