Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

केज — तालुक्यातील लाडेगाव येथे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या बालिकेवर दोन जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित बालिकेच्या आईने आरोपींच्या घरी जाऊन जाब विचारला असता आरोपींच्या नातेवाईकांनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १ मे ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वैभव विष्णू अंबाड आणि मयूर चंद्रकांत अंबाड यांनी बालिकेला विविध कारणांचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मे महिन्यात पहिल्यांदा बालिकेला आमिष दाखवून घरी बोलावण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर संबंधित दोघांनी पुढील काळातही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित बालिकेची आई आरोपींच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. यावेळी लक्ष्मण नरसु अंबाड आणि चंद्रकांत लक्ष्मण अंबाड यांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने २१ ऑगस्ट रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून वैभव अंबाड, मयूर अंबाड, लक्ष्मण अंबाड आणि चंद्रकांत अंबाड या चौघांविरुद्ध लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.