बीड — मारहाण ,खून यासारख्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेची इभ्रत रोज वेशीला टांगली जात आहे. अशाच आणखी एका घटनेने खळबळ माजली आहे.गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या जुन्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले असून,न्यायालयीन प्रक्रियेनंतर ताब्यात आलेल्या शेतजमिनीत काम करत असलेल्या एका वकिलावर दोन भावांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित वकिलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून डोके, पाठ, छाती आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत झाल्याच फिर्यादीत म्हटले आहे.
गेवराई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, विकास छत्रभूज मिसाळ (वय 43, व्यवसाय- वकील, रा. सावरगाव) हे गेल्या वीस वर्षांपासून बीड जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाची सावरगाव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा असून त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका आहेत. फिर्यादीनुसार, त्यांच्या आई सागराबाई यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सावरगाव शिवारातील गट क्रमांक 319 मधील 23 गुंठे जमीन ताब्यात मिळाल्यानंतर ते त्या जमिनीची शेती करत आहेत.
फवारणी सुरू असतानाच हल्ला
11 जुलै रोजी सकाळी सुमारे आठ वाजता विकास मिसाळ हे दीपक अंगद जाधव यांच्यासह शेतात भेंडी पिकावर औषध फवारणी करण्यासाठी शेतात गेले. फवारणी सुरू असताना पांडुरंग कान्होबा मिसाळ व त्याचा भाऊ भागवत कान्होबा मिसाळ हे हातात लाकडी काठ्या घेऊन तेथे पोहोचले. संबंधित जमीन आपण खरेदी केली आहे असं म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच हा वाद थेट हल्ल्यात बदलला.
फिर्यादीनुसार, पांडुरंग मिसाळ यांनी लाकडी काठीने विकास मिसाळ यांच्या उजव्या गुडघ्यावर जोरदार प्रहार केला. यामूळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर भागवत मिसाळ यांनी काठीने पाय, पाठ, छाती, खांदा, डोके आणि कानाजवळ वारंवार मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जमिनीवर पाडून पुन्हा मारहाण
मारहाणीतून बचाव करण्यासाठी विकास मिसाळ यांनी एका आरोपीच्या हातातील काठी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पांडुरंग मिसाळ याने त्यांना जमिनीवर पाडून दाबून धरले. त्यानंतर भागवत मिसाळ याने पुन्हा त्यांच्या पायावर काठीने मारुन गंभीर जखमी केले. यावेळी “या जमिनीत पुन्हा दिसलास तर कायमचा काटा काढू,” अशी धमकीही दिली.
मारहाणीचा व्हिडिओ; साक्षीदारालाही मारहाण
या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण विकास मिसाळ यांच्यासोबत असलेले दीपक अंगद जाधव यांनी मोबाईलमध्ये केले. मात्र व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याशिवाय विकास मिसाळ यांच्या खिशातील सुमारे 60 हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोडण्यात आला.
गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग कान्होबा मिसाळ व भागवत कान्होबा मिसाळ, दोघेही रा. सावरगाव, ता. गेवराई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 115(2), 118(1), 118(2), 3(5), 324(4), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

