फलटण — येथील सरकारी डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत माहिती अशी, फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी संशयित गोपाळ बदने 35 वर्ष, मुळ रा.चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण व प्रशांत किसन बनकर 29 वर्ष रा. बनकर निवास लक्ष्मीनगर, फलटण हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. यामधील गोपाळ बदने याने जामिनासाठी फलटण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.या दाखल जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने दोषारोप पत्रातील प्रथमदर्शनी आलेले तांत्रिक पुरावे व युक्तिवादाच्या आधारे बदने याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयामध्ये आरोपी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली. त्यास सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव काटकर व सरकारी पक्षाला मदत म्हणून मूळ फिर्यादीचे वकील सदाशिव सानप यांनी यूक्तीवाद केला.

