Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

नेकनूर — ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना पोलीस व्हॅन मध्ये घेऊन येत असताना भीषण अपघात आज सायंकाळी झाला. नेकनूर–येळंब रस्त्यावर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या व्हॅन ची एका मोटरसायकलशी समोरासमोर धडक झाली.
या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय अक्षरशः तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमी मोटरसायकलस्वाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अर्चना कुटे यांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावरही वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात येत असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी सुरेश कुटे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ नेकनूर–येळंब रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेग, रस्त्याची परिस्थिती अथवा निष्काळजीपणा यापैकी कोणते कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या प्रवासादरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.