बुरखा घालून ज्वेलर्समध्ये हातसफाई; केज पोलिसांनी मालेगावातून महिलेला पकडले

केज — शहरातील नामांकित श्री हनुमान ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून प्रवेश करत लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलांच्या टोळीचा केज गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून ४ लाख ४ हजार रुपये किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहेत.

१ जुलै रोजी भरदिवसा चोरी

१ जुलै रोजी दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला ग्राहक बनून श्री हनुमान ज्वेलर्समध्ये दाखल झाल्या होत्या. दागिने पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी सेल्समनची नजर चुकवली आणि ५ लाख ९९ हजार ९५५ रुपये किमतीचे ४७ ग्रॅम वजनाचे चार मिनी गंठण लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती.

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि अमिरोद्दीन इनामदार यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजमधून जीपचा माग काढला

चोरीनंतर पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे संशयित महिलांनी MH 05 AX 7685 क्रमांकाच्या जीपचा वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी जीपचालकाचा शोध घेतला.

चौकशीत जीपचालकाकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्याने चोरीत सहभागी असलेल्या तीन बुरखाधारी महिलांबाबत माहिती दिल्यानंतर तपासाची दिशा मालेगावकडे वळली.

मालेगावातून संशयित महिला ताब्यात

मिळालेल्या माहितीच्या आधारे केज गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कारवाई करत रिजवाना जाकीर शेख (रा. विजयनगर, मालेगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने अन्य दोन महिलांसोबत मिळून ज्वेलर्समधून दागिने चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिच्याकडून ६ ग्रॅम, ९ ग्रॅम आणि १६ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले. या दागिन्यांची एकूण किंमत ४ लाख ४ हजार रुपये आहे.

या प्रकरणातील अन्य दोन महिलांचा तसेच चोरीला गेलेल्या उर्वरित सोन्याचा शोध सुरू असून, तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, अमिरोद्दीन इनामदार, जमादार नितीन वारे, शिवाजी कागदे, महिला जमादार रमा भालेराव आणि गृहरक्षक दलाचे जवान थोरात यांच्या पथकाने केली. कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles