Home क्राईम डीवायएसपी भारत पांढरे यांच्या नेतृत्वात सलग 3 कारवाया; 11.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

डीवायएसपी भारत पांढरे यांच्या नेतृत्वात सलग 3 कारवाया; 11.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
8

बीड — परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक आणि मटका जुगाराविरोधात पोलिसांनी सलग कारवाया केल्या. तीन स्वतंत्र कारवायांमध्ये टेम्पोसह वाळू, रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ११ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे पथकासह गस्तीवर असताना कॅनाल रोड, नगर नाका परिसरातून नाट्यगृहाच्या दिशेने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नगर नाका बाजूकडून येणारा टाटा ७०९ टेम्पो क्रमांक MH 06 G 8459 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू आढळली.

ही वाळू राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड येथील गोदावरी नदीपात्रातून आणल्याचे चौकशीत समोर आले. या कारवाईत टेम्पो चालक नारायण आत्माराम धुताडमल (वय २४, रा. कांबी, ता. जि. बीड) आणि टेम्पो मालक अजय अशोक लेंडाळ (वय २३, रा. गोरे वस्ती, बांगर नाला, बीड) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि १२ हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बीएनएस कलम ३०३(२), ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

कॅनाल रोडवर मटका जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

याचदरम्यान कॅनाल रोड, नगर नाका परिसरात विनापरवाना ‘कल्याण’ मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसह छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान हमेद खान नादेर खान (वय २९, रा. अमराई, बालेपीर नगर रोड, बीड) हा लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देताना आढळून आला.

त्याच्याकडून १३ हजार रुपये रोख, चिटबुक, कार्बनचा तुकडा, बॉलपेन, १ लाख रुपये किमतीची बर्गमन स्कुटी (MH 23 BB 4487) आणि १० हजार रुपये किमतीचा ओपो मोबाईल, असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी हमेद खान नादेर खान तसेच गुंड पाटील, पूर्ण नाव माहीत नसलेला, रा. बीड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

चिंतामणी हॉस्पिटलसमोर छापा; मटका चालक पसार

दरम्यान, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, कॅनाल रोड येथे बाबा शेख हा विनापरवाना ‘कल्याण’ मटका चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संयुक्त पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच बाबा शेख घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी परिसराची पंचांसमक्ष झडती घेतली असता १,८१० रुपये रोख, चिटबुक, कार्बनचा तुकडा आणि काळ्या रंगाचा बॉलपेन असा मुद्देमाल मिळून आला.

सदर साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आला असून बाबा शेख, पूर्ण नाव माहीत नसलेला, रा. बीड याच्याविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखाली कारवायांची मालिका

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र आघाव, राठोड, नवनाथ डाके, अक्षय लोंढे, योगेश निर्धार आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला.

अवैध वाळू वाहतूक आणि मटका जुगाराविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या सलग कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here