आपला जिल्हा

उपोषणकर्त्यांना शेड बनवून देण्यास रोटरी क्लबची संमती; जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीकडे लक्ष

बीड — जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वर्षापूर्वी उपोषणार्थींसाठी बनविण्यात आलेल्या वट्ट्यावर शेड उभारून देण्यास रोटरी क्लबने संमती दिली असून आता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेवून पुढील कार्य करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, डॉ. गणेश ढवळे, शेख युनूस चर्‍हाटकर, एस.एम.युसूफ़, पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर, रामधन जमाले, भाऊसाहेब फुंदे, दिनानाथ शेवलीकर यांनी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी उपोषणार्थींचे होत असलेले हाल कमी व्हावे या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उंच वट्टा बनवून दिला. यामुळे उपोषणार्थींना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला परंतु उन्हाळ्यात उन्हामुळे, पावसाळ्यात पावसामुळे तर हिवाळ्यात थंडीमुळे एका दिवसापेक्षा जास्त चालणारे आमरण उपोषण करणार्‍यांचे हाल होत आहेत. यामुळे आंदोलनकर्त्यांची गैरसोय होते. हे लक्षात घेता आंदोलनकर्त्यांसाठी येथील वट्ट्यावर शेडची उभारणी करण्यात यावी. असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह सामाजिक संस्था म्हणून रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाऊन यांना सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आले होते. या निवेदनाची सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून रोटरी क्लबने दखल घेत गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या स्तरावर जिल्हाधिकारी यांना आंदोलनकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वट्ट्यावर शेड उभारून देण्याची परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन दिले असून आता आंदोलनकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी शेड उभारायचे कार्य प्रत्यक्षात सुरू होईल. असे या विषयी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस चर्‍हाटकर, एस.एम.युसूफ़, पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर, रामधन जमाले, भाऊसाहेब फुंदे, दीनानाथ शेवलीकर आदींनी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close