ब्रेकिंग

सोशल माध्यमांवर जिल्हाधिकाऱ्यांचे होतेय कौतुक;भोजगावात जाण्यासाठी ट्रॅक्टर मधून केला होता प्रवास

गेवराई  — अधिकारा पेक्षा ही “कर्तव्य” श्रेष्ठ असते. असा धडाच, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घालून दिला आहे. गेलेला जीव परत येणार नाही. पण, जिल्हाधिकाऱ्यांकडून कठीण प्रसंगात भोजगाव येथील दुखीत कुटुंबाला झालेली मदत किती मोलाची आहे हे त्या कुटुंबालाच माहित. या सकारात्मक घटनेने अख्या गावाचा कंठ दाटून आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या बांधिलकीचे सोशल माध्यमांवर प्रचंड कौतुक केले जात आहे.

गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात आणि विशेषत बीड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. परिसरातील पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले असून, अनेकांचे जीव ही गेले आहेत. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील एका युवकाचा प्रवास करताना पूलाच्या कठड्यावरून पडल्याने रविवार ता. 26 रोजी मृत्यू झाला होता. सदरील युवकाचा मृत्यू प्रशासनाने केलेल्या दूर्लक्षामुळे झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी गेवराई-शेवगांव राज्य रस्त्यावर , धोंडराई पुलावर भर पावसात मृतदेहासह आंदोलन ही
केले होते. काही दिवसांपूर्वी नदी पार करण्यासाठी रस्ता नसल्याने एका आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खांद्यावर घेऊन जाताना नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता. मयत मुलीच्या वडलांनी मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन नदी पार केली होती. त्यातच चार दिवसांपूर्वी झालेल्या युवकाच्या मृत्यूने भोजगावच्या नागरिकांमध्ये संताप आहे. असे असताना ही, घटनेच्या तिसऱ्याच दिवशी जिल्हाधीकारी राधा बिनोद शर्मा यांनी बुधवार ता. 29 रोजी भोजगाव ता. गेवराई येथे धावती भेट दिली. गावात जाणारा पूल वाहून गेल्याने जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने थेट ट्रॅक्टर मधून प्रवास करून गाव गाठावे लागले. पूरात वाहून गेलेल्या मयत युवकाच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. उघड्यावर आलेल्या कुटुंबाला धीर देत चार लाख रुपयांचा धनादेश मयत युवक सुदर्शन संदिपान संत (वय ३४ ) यांच्या पत्नीच्या हाती सुपूर्द केला. घटनेच्या दोनच दिवसानी जिल्हाधीकारी शर्मा यांनी भोजगावला भेट दिल्याने गावकऱ्यांना ही आश्चर्य वाटले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी गावात जाताना ट्रॅक्टरचा आधार घेऊन
प्रवास केला. तसेच, पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यायला ही ते विसरले नाहीत. यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , प्रभारी तहसिलदार रामदासी , मंडळ अधीकारी बाळासाहेब पखाले , तलाठी राजेश राठोड , विविध विभागाचे कर्मचारी उपस्तिथ होते. दरम्यान, मरणादारी जाऊन आणि मदत देऊन सांत्वन करणारांचे किती ही कौतुक केले तरी ते कमीच असते. अशा प्रतिक्रिया सोशल माध्यमांवर व्यक्त होत असून, जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close