आपला जिल्हा

अधिकाऱ्याने तोडले अकलेचे तारे, म्हणे डिझेलला पैसे नाही, लोकवर्गणी गोळा करुन द्या…तरच कालवा दुरुस्ती करु

उजवा कालवा फुटला ; मालेगाव-हाके वस्तीचा संपर्क तुटलेलाच

गेवराई  —- मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील मालेगाव ते हाके वस्ती दरम्यान एका ठिकाणी जायकवाडीचा उजवा कालवा फुटलेला आहे. दरम्यान हा कालवा अद्यापही दुरुस्त करण्यात आलेला नसून मालेगाव व हाके वस्तीचा संपर्क तुटलेलाच आहे. यामुळे हाके वस्तीवरील नागरिकांना दळवळण करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या कालव्याच्या भिंतीवरुनच अनेक शेतकऱ्यांना शेतात ये-जा करावी लागते, मात्र कालव्याची भिंत फुटून वाहून गेल्याने हा रस्ता देखील बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबली आहेत. याबाबत जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी जगताप यांना तेथील ग्रामस्थांनी फोन करून अडचणी सांगितल्या असता, जगताप यांनी आमच्या विभागाकडे वाहनांच्या डिझेलला पैसे नाहीत, तुम्ही ग्रामस्थ वर्गणी गोळा करून द्या.. त्यानंतरच आम्ही सदरील कालवा दुरुस्ती करु म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत.

गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील हाके वस्ती आहे. मालेगाव ते हाके वस्तीचे अंतर चार ते पाच किलोमीटरचे असून तेथील नागरिकांना उजव्या कालव्याच्या भिंतीवरुनच रस्ता आहे. दरम्यान हा कालवा मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसात फुटल्याने रहदारी रस्ता देखील बंद झाला आहे. तरी हा कालवा दुरुस्त न केल्याने पंधरा दिवसापासून हाके वस्तीवरील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत जलसंपदा विभाग अनभिज्ञ असल्याने हाके वस्तीवरील नागरिक तसेच शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close